Last Update:
 
मुख्य पान

निरपराधपणाचे प्रमाणपत्र पोलिस कसे देतात?
प्रतिनिधी
Monday, December 30, 2013 AT 04:41 PM (IST)
आमदार विष्णू वाघ यांचा सवाल
पणजी : तपास करण्यापूर्वीच पोलिस आरोपांची शहानिशा करू लागले तर कुठल्याही संशयिताला ते पकडू शकणार नाहीत. आरोपी निर्दोष आहेत की नाहीत ते न्यायालय ठरवेल. पोलिस परस्पर त्यांना निरपराध असल्याचे प्रमाणपत्र देऊ शकतात का, असा सवाल आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी केला.
ते पुढे म्हणाले, माझ्याबाबतीत जे काही घडले त्याबद्दल जनतेच्या मनात जरूर सहानुभूती आहे, पण ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणेने हे प्रकरण हाताळले ते पाहिल्यानंतर आमदाराला न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसांचे काय होणार?

पोलिस तपासातील ढिलाईचे समर्थन करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेली विधाने ऐकून आपणाला प्रचंड धक्का बसला. रेवोडा येथे त्या दिवशी काय काय झाले हे "चक्षुर्वैसत्यम्‌' थाटात त्यांनी सांगितले. त्यावरून हल्लेखोरांच्या जमावात कानटोपी घालून मुख्यमंत्रीही व्यक्तिशः हजर होते की काय, असेही क्षणभर वाटून गेले. बुरखाधारी हल्लेखोरांना वाघ यांनी कसे ओळखले, असा प्रश्‍न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी माझी तक्रार नीट वाचलेली दिसत नाही. त्यात मी स्पष्टपणे "काही हल्लेखोर' असे म्हटले आहे. सामाजिक जीवनात गेली तीस वर्षे मी वावरतो आहे. त्यामुळे शेकडो लोकांना मी नावे व चेहऱ्यांसकट ओळखतो. आज किरण कांदोळकर यांचे समर्थक म्हणून वावरणारे अनेक लोक पूर्वी कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. भाजप मंडळावरील अनेक पदाधिकारी पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. माझी त्यांच्याशी तेव्हापासून ओळख आहे. निळकंठ हळर्णकर यांच्या सांगण्यावरून आरोपींची नावे द्यायला मी दूधपिता बच्चा नाही, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे, असेही श्री. वाघ यांनी म्हटले आहे. 

ज्या निगरगट्टपणे मुख्यमंत्र्यांनी हल्लेखोरांची पाठराखण केली आहे, ती पाहता या राजवटीत मला न्याय मिळेल, अशी सुतराम शक्‍यता मला वाटत नाही. पोलिस जाणीवपूर्वक कमकुवत केस उभी करतील, तपासात कच्चे दुवे ठेवतील, अशी दाट शंका वाटत असल्याचेही श्री. वाघ म्हणाले.
येत्या 31 डिसेंबरपर्यंत मी वाट पाहीन. त्यानंतर माझी लढाई जनतेच्या न्यायालयात नेईन. आमदारकीपेक्षा मला माझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. लाचार होऊन साखरभात खाण्यापेक्षा स्वाभिमानी राहून पेज पिणे मी अधिक पसंत करीन, असे आमदार वाघ यांनी म्हटले आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: