Last Update:
 
मुख्य पान

नववर्ष स्वागतासाठी लाखो पर्यटक गोव्यात
प्रतिनिधी
Monday, December 30, 2013 AT 04:48 PM (IST)
राज्यातील साधनसुविधांवर ताण; 1150 पोलिसांकडून वाहतुकीवर नियंत्रण
पणजी : नववर्षाच्या स्वागतासाठी आज संध्याकाळपर्यंत देश-विदेशातील सुमारे तीन लाख पर्यटक गोव्यात पोचले. नाताळपासून गोव्यात नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांचे येणे सुरूच आहे. उद्यापर्यंत पर्यटकांचा आकडा पाच लाखांवर जाण्याची शक्‍यता आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने एकाचवेळी पर्यटक आल्याने येथील साधनसुविधांवर पडलेला ताण स्पष्टपणे जाणवत आहे. किनारी भागात अर्धा किलोमीटर अंतर जाण्यासाठी तासभर असे आजचे समीकरण होते. पणजी, म्हापसा, वास्को, मडगाव, शहरांतही आज गोव्याबाहेरील नोंदणी क्रमांक असलेल्या मोटारगाड्या ठळकपणे जाणवण्याइतपत होत्या. दुपारी पणजीतील 18 जून रस्त्यावर बहुतेक पार्किंग याच गाड्यांनी अडविले होते. दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्यात पर्यटकांची संख्या जास्त होती. सध्या रस्त्यावर असलेल्या गाड्यांपैकी पन्नास टक्के गाड्या या पर्यटकांच्या होत्या. उत्तर गोव्यात पोलिस ठाण्यांतील सातशे व वाहतूक पोलिस विभागातील 450 मिळून 1150 पोलिस केवळ वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहेत. दक्षिण गोव्यातही सहाशे पोलिस वाहतूक नियंत्रण करत आहेत.
किनारी भागातील रेस्टॉरंट आजपासूनच गर्दीने ओसंडून वाहत आहेत. तारांकित हॉटेल्स सोडली तर इतर हॉटेलांतील आरक्षण आज दुपारीच पूर्ण झाल्याचे चित्र होते. युरोपात धुक्‍याचा त्रास विमानोड्डाणाला जाणवला असल्याने नेहमी पन्नासेक हजाराच्या संख्येने येणारे युरोपीय पर्यटक यावेळी आलेले दिसत नाहीत. किनारी भागात आणि बड्या हॉटेल्समध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या, नृत्यरजन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अर्थातच ही सारी मौजमस्ती सशुल्क आहे.
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटकांनी राज्यात गर्दी केली आहे. किनारी भागात वाहने ठेवण्यास जागाच उपलब्ध नसल्याचे चित्र दिसत आहे. विविध ठिकाणी होत असलेल्या मेजवान्या आणि संगीतविषयक कार्यक्रमांची रेलचेल यामुळे आजच "मस्तीभऱ्या' वातावरणाची निर्मिती झाली. मंगळवारी (ता.31) मध्यरात्री मौजमस्तीची सर्वोच्च सीमा गाठली जाईल, यात शंका नाही."खा प्या मजा करा,' असा संदेश सर्वत्र गेल्याने वर्षाच्या अखेरीला थिरकण्यासाठी लाखो पावले गोव्याकडे वळली आहेत.

रसरशीत वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यांनी स्वतःसोबत आणलेल्या शेकडो चारचाकी वाहनांनी बहुतांश मोकळी जागा व्यापली आहे. त्याचा ताण किनारी भागावर पडला आहे. बहुतेक जणांनी हॉटेलांमध्ये आरक्षण केले आहे. मात्र, जागेअभावी तरुणांचे गट चारचाकीतून फिरत कोठे जागा मिळतेय का, याचा शोध घेताना दिसत आहेत. काळजाला भिडणारे संगीत, त्यावर थिरकणारी पावले, रिते होणारे चषक याच्या साथीने मौजमस्तीचे वातावरण उत्तरोत्तर रंगत जाणारयात शंका नाही. किनाऱ्यावरील विद्युतझोतात फिरण्याऐवजी काही पर्यटकांनी आज सायंकाळी मांडवी नदीतील नौकाविहाराचा आनंद लुटणे पसंत केले. नौकेचे तिकीट मिळवण्यासाठी मोठ्या रांगा मांडवी जेटीच्या परिसरात लागल्याचे चित्र दिसले. एकेकाळी अवघ्या काही नृत्यरजन्या नववर्षाच्या पूर्वसंध्येला गोव्याला आयोजित केल्या जात असत व त्यात सहभाग बहुसंख्य ख्रिस्ती बांधवांचा असे, परंतु अलीकडे पार्ट्यांच्या जल्लोषाबरोबरच नृत्यरजनींची संख्या वाढली आहे, संगीताचे कार्यक्रमही होऊ लागले आहेत. दक्षिण गोव्यातील सासष्टीतील परिसरात खुल्या मैदानात नृत्यरजनीसाठी मंडप सुसज्जझालेले आहेत.

"एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक प्रथमच गोव्यात'
पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर म्हणाले, नववर्ष स्वागतासाठी यंदा लाखोंनी गोव्याला पसंती दिली आहे. आज सायंकाळच्या आकडेवारीनुसार तीन लाख पर्यटक राज्यात असून उद्यापर्यंत तो आकडा पाच लाखांवर जाणार आहे. नववर्ष स्वागतासाठी एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक प्रथमच गोव्यात आले आहेत. रस्त्यावर वाढलेल्या वाहतुकीवरून सर्वांना त्याची कल्पना आली असेलच. जगात अनेक ठिकाणी आर्थिक मंदीचे वातावरण असतानाही पर्यटकांनी गोव्यात येणे पसंत केल्याने आपल्या देशालाही मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन मिळाले आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेतील उलाढालही वाढली आहे. एकंदरीत हे उत्साहाचे वातावरण आहे.  
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: