Last Update:
 
मुख्य पान

"एनडीए'चे विभाजन अटळ
प्रतिनिधी
Sunday, June 16, 2013 AT 12:52 AM (IST)
Tags: -

"जेडीयू'कडून आज होणार घोषणा

पाटणा- गेल्या सतरा वर्षांपासून भारतीय जनता पक्षासोबत असलेली मैत्री संपुष्टात आणत संयुक्त जनता दल (जेडीयू) राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याच्या पूर्णपणे मानसिकतेत आहे. भाजपची साथ सोडण्याची "जेडीयू'कडून आज(ता. 16) अधिकृतपणे घोषणा होण्याची औपचारिकता पार पाडली जाऊ शकते.

भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांच्या 23 जूनला येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी शाळेचे मैदान देण्यास नकार दर्शवीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी "एनडीए'मधून बाहेर पडण्याचे सूतोवाच केले होते. यामुळे संतापलेल्या प्रदेश भाजप नेत्यांनी नितीशकुमार व "जेडीयू'वर थेट शाब्दिक हल्ला चढविण्यास सुरवात केली. नितीशकुमारांनी बोलावलेल्या बैठकीला जाण्याचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि बिहार "एनडीए'चे समन्वयक व रस्ते विकास मंत्री नंदकिशोर यांनी टाळले.

"नितीशकुमारांना आता भेटण्याची काहीही गरज नाही', असा सूचनावजा आदेश राजनाथसिंह यांनी दिल्यानंतर प्रदेश भाजपचे नेते अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी नितीशकुमारांच्या थेट राजीनाम्याचीच मागणी केली. राज्यात 2010 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने "जेडीयू'ला नव्हे, तर "एनडीए'ला मते दिली होती. धमक असेल तर नितीशकुमारांनी पुन्हा जनादेश घेण्याची हिंमत दाखवावी, असे खुले आव्हान प्रदेश भाजपने दिले.

भाजपचा रुद्रावतार बघितल्यानंतर नितीशकुमारांनीही आपले सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेसचे चार आणि अन्य अपक्ष आमदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. "जेडीयू'कडून भाजपच्याच काही नेत्यांना गळ घातली जात असल्याची चर्चा आहे. भाजप आणि "जेडीयू' या दोन्ही पक्षांनी आपापले आमदार ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. "जेडीयू'ची उद्या (ता. 16) बैठक होऊन त्यात भाजपची साथ सोडण्याची घोषणा केली जाऊ शकते. तसेच नितीशकुमार उद्याच राजभवनात जाऊन राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना सरकारमधून भाजप मंत्र्यांची नावे हटविण्याचे निवेदन देऊ शकतात. भाजपच्या मंत्र्यांनी विरोध केला, तर राज्यातील सरकार बरखास्तही होऊ शकते.

...तेव्हा कुठे गेली धर्मनिरपेक्षता?
नितीशकुमार धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारत आहेत. मात्र, साबरमती एक्‍स्प्रेसला आग लावली गेली. गुजरातमध्ये लोकांची खुलेआम कत्तल करण्यात आली. तेव्हा कुठे गेली होती धर्मनिरपेक्षता, असा प्रश्‍न राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला. लालकृष्ण अडवानी धर्मनिरपेक्ष असल्याचे कौतुक नितीशकुमार करतात. मात्र, याच अडवानींनी बाबरी मशीद पाडली होती. बिहार आणि देशातील अल्पसंख्याकांना नितीशकुमारांचा खरा चेहरा समजला आहे. त्यांची मते नितीशकुमारांना कधीही मिळणार नाहीत, असा दावा लालूप्रसादांनी केला. "जेडीयू'चे अध्यक्ष शरद यादव यांच्यावरही टीका करण्याची संधी लालूप्रसादांनी सोडली नाही. मंडल आयोग लागू केल्याचे फुशारकीने सांगणाऱ्या याच शरद यादवांनी अडवानींना रथयात्रेदरम्यान बिहारमधून सुरक्षितपणे बाहेर काढू, असे जाहीरपणे म्हटले होते, असा हल्ला लालूप्रसादांनी चढविला.

त्र्यंबकराजा पावणार?
नितीशकुमारांच्याच निवासापासून हाकेच्या अंतरावर राहत असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या घरी आता आनंदाचे उधाण आले आहे. "मी नुकताच त्र्यंबकेश्‍वर आणि शिर्डीला जाऊन आलोय. "एनडीए' पूर्णपणे विसकटणार आहे. देवाला सगळे काही माहीत आहे,' असेही ते म्हणाले.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: