Last Update:
 
मुख्य पान

स्वतंत्र मराठी अकादमीचा निर्णय दुर्दैवी
प्रतिनिधी
Sunday, June 16, 2013 AT 12:50 AM (IST)
Tags: -
स्वतंत्र मराठी अकादमीचा निर्णय दुर्दैवी
मान्यवर मराठीप्रेमींचे मत
पणजी, ता. 15 (सांस्कृतिक प्रतिनिधी) ः नवी गोवा मराठी अकादमी स्थापन करण्याच्या व कालांतराने गोमंतक मराठी अकादमी ताब्यात घेण्याचा सरकारचा निर्णय दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करून त्यामुळे आपण व्यथित झालो आहोत. गोमंतक मराठी अकादमी तमाम मराठीप्रेमींची व्हावी, ही मागणी विद्यमान कार्यकारिणीने धुडकावल्यानेच ही परिस्थिती उद्‌भवली असल्याचे मत मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष गोपाळराव मयेकर, गुरुदास सावळ, कोकणी मराठी परिषदेचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप व गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष सुरेश स. नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
विद्यमान गोवा मराठी अकादमीची घटना दुरुस्ती करून आजच्या फक्त साठ सदस्यांऐवजी ती तमाम गोमंतकीय मराठी जनांची व्हावी, अशी वेळोवेळी केलेली मागणी विद्यमान कार्यकारिणीने धुडकावून लावल्यामुळेच आजची परिस्थिती उद्‌भवलेली आहे, त्याची संपूर्ण जबाबदारी विद्यमान कार्यकारिणीवर आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
गोमंतक मराठी अकादमीचे कायमस्वरूपी सरकारीकरण होण्याचा धोका आम्हाला दिसतो आहे. भविष्यात सत्तेवर असणारे अकादमीचे रूपांतर सरकारी खात्यात करणार नाहीत, असे गृहीत धरता येणार नाही. यास्तव गोमंतक मराठी अकादमी लोकाभिमुख राहाणे, हाच एकमेव तोडगा आहे, असे आम्ही मानतो. विद्यमान कार्यकारिणीने ही बाब लक्षात घ्यावी व आवश्‍यक त्या दुरुस्त्या घटनेत कराव्यात.
विष्णू वाघ समितीने सादर केलेला अहवाल तसेच त्याआधी गोवा कायदा आयोगाने सादर केलेला अहवाल या दोहोंवर सखोल विचार विनिमय करून निर्णय घेणे मराठी अकादमीच्या आमसभेला आजही शक्‍य आहे. यास्तव आमसभेची तातडीची विशेष बैठक बोलावण्यात यावी, असे आवाहन आम्ही करत आहोत. असे स्पष्ट करून, विद्यमान कार्यकारिणीने तातडीने खास आमसभा बोलवावी. तसे त्यांनी न केल्यास आमसभा सदस्यांनी पुढाकार घेऊन खास आमसभा बोलवावी, घटना दुरुस्ती संदर्भात विचारविनिमय करावा, अशी आम्ही मागणी करीत आहोत.
आजच्या कार्यकारिणीपेक्षा वा आमसभा सदस्यापेक्षा गोमंतक मराठी अकादमी मोठी आहे याची जाण या सर्वांनी ठेवावी. विद्यमान कार्यकारिणीने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा व हंगामी सुकाणू समिती स्थापन करून त्या मार्फत विशेष आमसभा बोलवावी असा आमचा आग्रह आहे. असे पत्रकात नमूद केले आहे.

कोणतेही पद नको
अकादमीच्या घटना दुरुस्तीचा आमचा आग्रह अकादमी ताब्यात घेण्यासाठी चालला आहे, असा अपप्रचार पुन्हा केला जाऊ नये, म्हणून आम्ही जाहीर करीत आहोत, की यापुढे आम्ही मराठी अकादमीत कुठलेही पद स्वीकारणार नाही. एवढेच नव्हे तर अकादमीचे साधे सदस्यत्वही आम्हाला नको आहे, असे नि:संदीग्धपणे या मान्यवरांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. मान्यवरात गोपाळराव मयेकर (माजी अध्यक्ष, गोमंतक मराठी अकादमी), गुरुदास सावळ (माजी अध्यक्ष, गोमंतक मराठी अकादमी), सुरेश स. नाईक (अध्यक्ष, गोमंतक साहित्य सेवक मंडळ), रमाकांत खलप (अध्यक्ष, कोकण मराठी परिषद, गोवा).


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: