Last Update:
 
मुख्य पान

जीईसीतील रिक्त पदे भरण्यात दिरंगाई
प्रतिनिधी
Sunday, June 16, 2013 AT 12:52 AM (IST)
Tags: -
अनुभवी प्राध्यापक यंदाही खासगी अभियांत्रिकीकडे आकर्षित
पणजी, ता. 15 (प्रतिनिधी) ः फर्मागुढी येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त पदे नियमित पद्धतीने भरण्यात दिरंगाई होत असल्यामुळे यंदाही अनुभवी प्राध्यापक वर्ग खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे वळण्याची चिन्हे आहेत.
गेल्या दोन वर्षांत स्थापन केलेल्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी एकमेव अशा सरकारी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापकांची यंदाही पळवापळवी शिस्तबद्धरीत्या सुरू केली असून त्याचा फटका जीईसीला बसणार आहे.
जीईसीतील अनुभवी प्राध्यापकांना आपल्याकडे वळविण्यासाठी वेळेत नोकरभरती करण्याबरोबरच आकर्षक वेतन तसेच अन्य सुविधा देण्याचे तंत्र खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आरंभिले आहे. सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात 40 टक्के रिक्त पदे असून ती भरण्यात दिरंगाई केली जाते. काही प्राध्यापकांना वर्षानुवर्षे बढत्या मिळालेल्या नाहीत तर काही प्राध्यापक दरवर्षी नव्याने मुलाखतीना सामोरे जाऊन कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू होतात अशी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाची हालत आहे.
त्याचा फायदा घेऊन 2012 साली डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय व आसगाव येथील माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी महाविद्यालयाने गोवा अभियांत्रिकीच्या सी. गोखले व श्री. मरिअप्पन या ज्येष्ठ प्राध्यापकांना आपल्याकडे वळवले. काही कुशल सहाय्यक प्राध्यापक मागील वर्षी जीईसीतून खासगी अभियांत्रिकीकडे वळले तर यंदाही आठ ते दहा प्राध्यापक जीईसीला रामराम ठोकणार असल्याचा दावा खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सूत्रांनी केला.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा सुधारण्यासाठी आटापिटा चालवला असला तरी जीईसीतील रिक्त पदे भरण्यासाठी अजूनही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. अलीकडेच श्री. पर्रीकर फर्मागुढी येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात गेले होते त्यावेळी प्राचार्यांनीही रिक्त पदे भरण्याची त्यांना आठवण करून दिली होती.
अभियांत्रिकीत डॉक्‍टरेट पदवी घेणारे खूपच कमी असून असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना वाव नाही, नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले जात नाहीत, एम ई पर्यंतचे शिक्षण घेतलेल्यांना पाच ते सहा वर्षे शिकवूनही सेवेची हमी नाही अशी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थिती आहे. अनुभवी प्राध्यापकवर्ग इतरत्र वळल्यानंतर नव्या दमाच्या बी ई पर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना शिकवण्याची संधी जीईसीत मिळत असली तरी गुणवत्तेत ते कमी पडतात व विद्यार्थ्यांची दमछाक होते अशाही तक्रारी आहेत. जीईसीतील माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी शाखेतील चार अनुभवी कंत्राटी प्राध्यापक यंदा खासगी महाविद्यालयांकडे वळणार असे प्राचार्यांनाही कळले आहे.

35 टक्के अभियांत्रिकी
जागा सरकारी जीईसीत
राज्यातील चार अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी 35 टक्के म्हणजे 410 हून अधिक जागा सरकारी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात आहेत. विद्यार्थ्यांचा विचार करता अभियांत्रिकीतील रिक्त पदे भरण्याची सूचना अलीकडेच अभियांत्रिकीची महाविद्यालयाच्या पाहणीत नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रिडिटेशन कौन्सिलने केली आहे. मुख्य खासगी महाविद्यालयांपेक्षा सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शुल्क जवळजवळ 50 टक्‍क्‍यांनी कमी आहे त्यामुळे विद्यार्थीवर्ग या महाविद्यालयाला पसंती देतो. या महाविद्यालयाने सरकारात काही उच्च पदावर असलेला अधिकारीवर्गही दिला आहे


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: