Last Update:
 
मुख्य पान

म्हापशात चोरट्यांनी सहा दुकाने फोडली
प्रतिनिधी
Sunday, June 16, 2013 AT 12:51 AM (IST)
Tags: -
लाखभर रुपयांचा मुद्देमाल पळविला, गॅस कटरचा वापर
म्हापसा, ता. 15 (प्रतिनिधी) ः येथील सेंट अँथनी अपार्टमेंट व ला ब्रागांझा बिल्डिंग या दोन इमारतीत असलेली सहा दुकाने व एक बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे लाखभर रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गॅस कटरची गॅस संपल्याने सांगोडकर यांच्या सोन्याच्या दुकानातील लोखंडी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने चोरट्यांनी चार वकिलांची व इतर दुकाने फोडली. चोरट्यांनी गॅस कटर, गॅस सिलिंडर व लोखंडी पार (पारय) दुकानातच सोडून पोबारा काढला.
आज सकाळी 9 च्या सुमारास ही चोरीची घटना उघडकीस येताच म्हापसा पोलिसांना पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी सेंट अँथनी अपार्टमेंटच्या "बी' ब्लॉकच्या तळमजल्यावर असलेले ओम्‌कार गोल्ड वर्क शॉप या अजित सांगोडकर यांच्या मालकीच्या दुकानाच्या शटरवरील कुलुपाचा हुक गॅस कटरच्या साहाय्याने तोडला व दुकानात प्रवेश केला. दुकानातील लोखंडी तिजोरीवर असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून गॅस कटरद्वारे तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. गॅस संपल्याने त्याचा हा प्रयत्न सफल झाला नाही. संपलेले गॅस सिलिंडर तेथेच टाकून व दुकानातील सी सी टीव्हीचा रीसीवर पळविला.
चोरट्यांनी इमारतीच्या "सी' ब्लॉकच्या तळमजल्यावर काच दुकानात असलेल्या ऍड. सिवराली गडेकर व ऍड. गिना सिल्वेरा यांची कार्यालये फोडली. कार्यालयातील टेबलाच्या खणामध्ये रोख रक्कम सापडली नसल्याने ऍड. सिल्वेरा यांच्या कार्यालयातील तीन 93 रुपयांचे धनादेश तर ऍड. गडेकर यांच्या कार्यालयातील एलआयसी पॉलिसीची कागदपत्रे चोरून नेली. या दुकानांच्या पहिल्या मजल्यावर असलेला बर्नार्ड डिसोझा यांचा बंद फ्लॅटही फोडण्यात आला. मात्र या फ्लॅटमध्ये चोरट्यांना काहीही सापडले नाही.
याच अपार्टमेंटच्या गोम्स इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या ऍड. सिप्रियानो फर्नांडिस बार्रेटो यांचे कार्यालय चोरट्यांनी फोडले. या कार्यालयात चोरट्यांना 47 हजार रोखड सापडली.
नंतर चोरट्यांनी बाजूच्या जुने म्हापसा क्‍लिनिक हॉस्पिटल असलेल्या ला ब्रागांझा इमारतीत प्रवेश केला. इमारतीच्या प्रवेश द्वारावरच असलेल्या रवींद्र मांद्रेकर यांच्या शिलाई मशिन दुरुस्त करण्याच्या दुकानाच्या दरवाजावरील दोन्ही कुलूप तोडली व आत प्रवेश केला. दुकानात टेबलाच्या खणात ठेवलेले 15 हजार रुपये रोखड पळविली.
नंतर दि अदर इंडिया बुक स्टोअर या दुकानाचा दरवाजा चोरट्यांनी उघडला. आत पुस्तके असल्याचे पाहून चोरट्यांनी दुकानातून काहीच नेले नाही. त्यानंतर चोरट्यांनी ऍड. वीरेंद्र रुद्राजी पार्सेकर यांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. टेबलाच्या खणामध्ये फक्त 4 हजार सापडल्याने ऍड. पार्सेकर यांच्या फाईल, धनादेश बुक व बेल बॉंड फाडून तेथेच टाकला. तसेच मै फिर आऊंगा असे एका कागदावर चोरट्यांनी लिहून ठेवले होते.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिस उपनिरीक्षक प्रज्योत फडते, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामा रेडकर व यशवंत गावस यांनी घटनास्थळी सहकाऱ्यांसोबत भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास म्हापसा पोलिस करीत आहेत.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: